पुणे : येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरुन कैद्यांमध्ये वाद झाला. दाेन कैद्यांनी एकाला मारहाण केली. कैद्याला मारहाण केल्या प्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक दोन परिसरातील बराकीच्या परिसरात स्वच्छतागृह आहे. बुधवारी (२७ मे) सकाळी सातच्या सुमारास प्रसाधनगृहाच्या परिसरातील हौदाजवळ कैदी थांबला होता. तो स्वच्छतागृहात जात असताना दोघांनी अडवून त्याच्याकडे तंबाखू मागितली. तंबाखूवरुन दोघांनी वाद घालून जेवण वाढण्यासाठी वापरले जाणारे छोटे माप आणि प्लास्टिकची बादली कैद्याच्या डोक्यात मारली. त्यात तो जखमी झाला. कैद्यांमधील हाणामारीचा प्रकार पाहून कारागृहातील रक्षकांनी तेथे धाव घेतली. मारहाण करणाऱ्या दोघांना जताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत.
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीच्या घटना, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
तरुणाच्या डोक्यात गज घालून मोबाइल हिसकावला
शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धनकवडीत २५ लाखांची रोकड लूट, तसेच बिबवेवाडीत डिलिव्हरी बाॅयला लुटण्याच्या घटना ताज्या असतानाच कात्रज-कोंढवा रस्त्यावर पादचारी तरुणाच्या डोक्यात गज घालून दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कात्रज परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. २४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तरुण दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला. कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊलीनगर बस थांब्याजवळ दुुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्याला अडवून पैशांची मागणी केली. तरुणाने नकार दिल्यानंतर चोरट्यांनी शिवीगाळ केली. तरुणाच्या डोक्यात गज घातला. गज घातल्याने तरुण जखमी झाला. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या हातातील दहा हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासलेे असून, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.
कोथरूडमध्ये भरदिवसा घरफोडी; सदनिकेतून दोन लाखांचा मुद्देमाल चोरी
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, तसेच लॅपटाॅप असा एक लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पौड रस्त्यावरील शीलाविहार काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत. बुधवारी (२७ मे) सकाळी दहाच्या सुमारास तक्रारदार आणि कुटुंबीय हे कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, तसेच लॅपटाॅप असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदार कामावरुन परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार दगडे तपास करत आहेत.
