Pune Crime News Update: येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीतून (लाॅकअप) पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. लाॅकअपमधील स्वच्छतागृहातील काचा उचकटून आरोपी पसार झाला. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार आरोपीला येरवड्यातून अटक केली.

शैलेश राजू माेहिते (वय १९, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते याला अल्पवयीन युवतीवर बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन त्याला ५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहितेने काेठडीत अंथरण्यासाठी चादर हवी आहे, असा बहाणा केला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून तो स्वच्छतागृहात केला. स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा सरकवून उतरला आणि पसार झाला. काही वेळानंतर मोहिते पसार झाल्यााचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोहिते याला येरवडा परिसरातून रात्री दहाच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

दुचाकी विक्री दालनातून पावणेतीन लाखांची रोकड चोरणारा गजाआड

हडपसमधील दुचाकी विक्री दालनातून पावणेतीन लाख रुपयांची रोकड चोरुन पसार झालेला कामगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कामगाराकडून दुचाकी, तसेच अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

बापूराव संदीपान गायकवाड (वय २५, सध्या रा. कैलासनगर, वडकी, हडपसर-सासवड रस्ता, मूळ रा. निळज, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर भागातील दुचाकी विक्री दालनात कामगारांचे वेतन करण्यासाठी दोन लाख ७० हजार रुपयांची रोकड मालकाने ठेवली होती. दुचाकी विक्री दालनात काम करणारा कामगार गायकवाड याने कप्प्यात ठेवलेली रोकड चोरली. रोकड चोरीला गेल्यानंतरा मालकांनी याबाबत हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांनी फिर्यादीत संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसंनी तपास सुरू केला.

दुचाकी विक्री दालनातून कामगार गायकवाड याने रोकड चोरल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस कर्मचारी प्रशांत कर्णवर आणि अमित कांबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाड याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख ५९ हजार रुपये आणि दुचाकी असा तीन लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गनु्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक अभिजित पवार, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, नासीर देशमुख यांनी ही कामगिरी केली.