पुणे : चोरीचा आरोप केल्याने तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटन हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.
अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अहिरे याच्या भावाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघा्ंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे खासगी ठिकाणी कामाला होता. आरोपींनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. आरोपींनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ केली होती.
मारहाण, तसेच चोरीचा आरोप केल्यानंतर अतुल नैराश्यात होता. मानसिक तणावाखाली त्याने २३ फेब्रुवारी राोजी मध्यरात्री पुणे ते काेल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपींची धमकी, तसेच मारहाणीमुळे भावाने आत्महत्या केल्याची फिर्याद नुकतीच देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.
बिबवेवाडीत घरफोडी; १६ लाखांचे दागिने चोरी
बिबवेवाडी भगात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बिबवेवाडीतील महेश सोसायटीत राहायला आहेत. २२ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, तसेच रोकड असा १६ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भुवड तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी रास्ता पेठेत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
कारवाईची भीती दाखवून एकाची ३१ लाखांची फसवणूक
काळ्या पैसे व्यवहारात बेकायदा बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एकाची ३१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत एका ५१ वषीय तक्रारदाराने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्कर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी सायबर चोरट्याने केली.
‘काळ्या पैसे व्यवहारात (मनी लाँड्रिग) बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती चोरट्याने त्यांना दाखविली. चौकशीची भीती दाखवून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ३१ लाख ४५ हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पवार तपास करत आहेत.
सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी आतापर्यंत सायबर चोरट्यांनी नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

