Pune Crime News: सोमवार पेठेतील पाेलीस वसाहतीतील घरातून चोरट्यांनी सात लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक पाचमध्ये तक्रारदार महिला राहायला आहे. चोरट्यांनी घराचा दरवाजा बंद असताना आत प्रवेश केला. कपाटातून सात लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस वसाहतीतील घरातून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरटा माहितगार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.

पर्वती भागात ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तीन लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना पर्वती परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला कोथरूड भागातील डहाणूकर काॅलनीत राहायला आहेत. त्या ५ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास पर्वती परिसातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची कंठी माळ आणि मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केले. चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी पर्वती परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील एबीसी फार्म चौकात घडली. या प्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील संतोष कदम (वय २२, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुाचकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष मारुती कदम (वय ४७) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील हा २७ एप्रिल रोजी मुंढव्यातील एबीसी फार्म चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार स्वप्नील याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पोमण तपास करत आहेत.