पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २८ लाखांचे मेफेड्रोन, मोटार, मोबाइल संच असा ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले आरोपी गेले वर्षभरापासून शहरात मेफेड्रोनची तस्करी करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
किशन नंदकिशोर लधड (वय ३५, रा. धानोरी), हनुमान रूपाराम चौधरी (वय ३३, रा. वडगाव मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील केसनंद भागात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या किशन लधड याला वाघोली पोलिसांनी अटक केली होती. तपासात वडगाव मावळमधील तस्कर हनुमान चौधरी याने त्याला मेफेड्रोन पुरविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौधरीला वडगाव मावळ परिसरात सापळा लावून पकडले.
चौधरी याच्या मोटारीत मेफेड्रोन सापडले. त्याच्याकडून २८ लाख रुपयांचे १३४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. चौधरी मूळचा राजस्थानमधील आहे. त्याने राजस्थानातून मेफेड्रोन आणून शहरात विक्री केल्याची मााहिती तपासात मिळाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक अमोल काळे, प्रदीप मोरे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, मारुती वाघमारे यांनी ही कारवाई केली.
गावठी दारू तयार करणारी महिला अटकेत; गावठी दारू, रसायनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : नगर रस्ता परिसरातील भावडी गावात बेकायदा गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेेने छापा टाकला. गावठी दारू तयार करुन विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू, तुरटी, तसेच गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अनिशा योगेश गुडदावत (वय २०, रा. भावडी, ता. हवेली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नगर रस्त्यावरील भावडी गावातील मोकळ्या जागेत एक महिला गावठी दारू तयार करुन विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सातमधील पोलीस कर्मचारी नितीन धाडगे आणि प्रतिक्षा पानसरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर छापा टाकला. या कारवाईत १८ लिटर तुरटी मिश्रित पाणी, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, अन्य साहित्य असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हातभट्टी तयार करणारी महिला अनिशा गुडदावत हिला ताब्यात घेण्यात आले.
तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, ऋषीकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कारवाई केली.
