पुणे : विश्रांतवाडी भागात वैमनस्यातून एका तरुणाचा खून केल्यानंतर आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत ही घटना घडली. आरोपींनी नागरिकांना धमकावून घराच्या दरवाज्याची तोडफोड केली. विश्रांतवाडी भागात १५ एप्रिल रोजी मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीतील गौरव तेलंगी याच्यावर काेयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घडली होती.
या प्रकरणात पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह साथीदारांना अटक केली होती. तेलंगी याचा खून केल्यानंतर मध्यरात्री पसार झालेले आरोपी तौफिक, राजन आणि साथीदार शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्याकडे कोयते होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजविली. ’ प्रतिस्पर्धी टाेळीतील सराइतांना साथ देऊ नका.
तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू’, अशी धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन पसार झाले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तौफिक शेख, राजन दौरास्वामी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
तळजाई वसाहतीत दुचाकींची तोडफोड करणारा अटकेत पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत दहशत माजवून तोडफोड करणाऱ्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. साहिल उर्फ भावड्या संतोष कुचेकर (वय २५, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संजय वसंत खंदारे (वय ४२, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ एप्रिल) मध्यरात्री दीडच्या सुमारास कुचेकर हा तळजाई वसाहत परिसरात आला. ‘मी तळजाई वसाहतीतील भाई आहे. माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याला जिवे मारू’, अशी धमकी त्याने रहिवाशांना दिली. त्यानंतर त्याने वसाहतीतील दुचाकींची दांडक्याने तोडफोड करून दहशत माजविली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश मोरे, उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तपास करत आहेत. यापूर्वी तळजाई वसाहत दहशत माजविण्यासाठी सराईतांनी वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी सराइतांनी तळजाई वसाहतीतील २५ हून जास्त वाहनांची तोडफोड केली होती.
