पुणे : वैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणाचा खून करून पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

करण गिरीश काशीद (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. अल्पवयीन आणि करण यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीस्वार करण सिंहगड रस्ता भागातील सनसिटी परिसरातून निघाला होता. त्या वेळी अल्पवयीनांनी त्याला अडवून कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाला. सनसिटी परिसरात झालेल्या खून प्रकरणात परिसरात घबराट उडाली होती.

पसार झालेले अल्पवयीन हे कर्वेनगर परिसरातील वनदेवी मंदिराजवळ थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. खून प्रकरणानंतर पोलिसांनी दोन तासात अल्पवयीनांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, अजित शिंदे, प्रदीप राठोड, साधना पवार, रेहाना शेख, साईकुमार कारके, अमित गद्रे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

खून करण्यासाठी कोयते बाळगणारे अल्पवयीन ताब्यात

किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी कोयते बाळगणाऱ्या चौघा अल्पवयीनांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. हडपसर परिसरात ही कारवाई करण्यत आली. त्यांच्याकडून कोयते, गिलवर, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अल्पवयीनां विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी शेखर काटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीनांचा एकाशी वाद झाला होती. १७ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक हडपसर परिसात गस्त घाल होते. त्या वेळी एकाच दुचाकीवरुन चौघे जण निघाले असून, त्यांंच्याकडे कोयते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मीमाता मंदिराजवळ सापळा लावून दुचाकीवरील चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयते, गिलवर जप्त करण्यात आली. चौकशीत अल्पवयीनांनी एकाचा खून करण्यासाठी कोयते बाळगल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.