पुणे : नाशिकमधील अशोक खरात, तसेच पुण्यातील ऋषीकेश वैद्य प्रकरण ताजे असतानाच एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले. कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवून भोंदूने महिलेवर बलात्कार केला, तसेच महिलेची ५० लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी एका भोंदूविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी एका भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पंढरपूर परिसरातील तरटगावचा रहिवासी आहे. याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ती वेगळी राहत होते. महिलेची पाच वर्षांपूर्वी एकामार्फत आरोपीशी ओळख झाली. तेव्हा आरोपीने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेला त्याने जाळ्यात ओढले. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लाॅजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्याने महिलेला माणगाव परिसरात बोलावून तेथील एका लाॅजवर बलात्कार केला. महिलेला नोकरी, तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. काही रक्कम रोख स्वरुपात घेतली, तसेच महिलेकडून दागिने घेतले. गेले पाच ते सहा वर्ष हा प्रकार सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती. या बाबत एका महिलेने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित गुन्हा पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आल्यानंतर वैद्यला पोलिसांनी अटक केली होती. वैद्य याला न्यायालायाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने वैद्य याची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर महिलेने वैद्य याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती.
