पुणे : तडीपार गुंडाने नागरिक आणि दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविल्याची घटना लष्कर भागातील भोपळे चौकात घडली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मलंग मेनन (वय २९, रा. भीमपुरा, लष्कर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रविवारी (१ जून) रात्री दहाच्या सुमारास भोपळे चौकातून दुचाकीवरून निघाली होती. त्या वेळी शहरातून तडीपार करण्यात आलेला गुंड मेनन तेथून निघाला होता. दुचाकीस्वार महिला आणि मेनन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. शिवीगाळ केल्याने महिलेने त्याला जाब विचारला. तेव्हा मेननने त्याच्याकडील कोयता दुचाकीस्वार महिलेवर उगारला.
वादावादी सुरू असताना नागरिक आणि दुकानदार तेथे जमा झाले. तेव्हा मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांवर त्याने कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मेननला अटक केली. मेनन याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर तो आदेशाचा भंग करून शहरात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस हवालदार बनसोडे तपास करत आहेत.