पुणे : वारजे भागात मद्यधुंद मोटार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली. कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे मोटार चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी दुपारी वारजे परिसरातून निघाले होते. त्या वेळी वारजे – एनडीए रस्त्याने प्रवासी वाहतूक करणारी मोटार भरधाव वेगात शिवणेकडे निघाली होती. त्या वेळी भरधाव मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोटार चालकाचा पाठलाग सुरू केला.

वारजे चौकाजवळ मद्यधुंद मोटार चालकाने एका टेम्पोला धडक दिली. पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून मोटार अडवली. त्या वेळी तेथे असणारे वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी या घटनेची माहिती दिली. मोटार चालकाला ताब्यात घेऊन वारजे पोलीस चौकीत नेण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक पोलीस मोटारीत बसले. तेव्हा मोटार चालकाने भरधाव वेगाने मोटार पोलीस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी मोटार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी मोटार चालकाला चोप देऊन ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत मोटार चालकाने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा

‘ट्रिपलसीट’ निघालेल्या दुचाकीस्वाराला अडवून कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर घडली. या प्रकरणी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई सोहल शेख यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेले दाेघे जण छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन निघाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर एकाच दुचाकीवरुन निघालेल्या तिघांना पोलीस शिपाई शेख यांनी पाहिले. तिघांना त्यांना अडवले. त्यांची चौकशी सुरु केली. तेव्हा दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोघांनी शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘आम्ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत’, असे सांगून दुचाकीस्वारासह साथीदारांनी शेख यांच्याशी वाद घालून कारवाईस विरोध केला. पोलीस शिपाई शेख यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीत शेख यांच्या गणवेशावरील पट्टी तुटली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत.