पुणे : वैमनस्यातून टोळक्याने अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

याबाबत एका अल्पवयीनाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश महादेव सूर्यवंशी (वय २०), अथर्व नीलेश भालशंकर (वय १९), आदेश सुरेश म्हस्के (वय १९, तिघे रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. २ मार्च रोजी अल्पवयीन दांडेकर पूल परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला गाठले. त्याला शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक इसराईल शेख तपास करत आहेत.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ३५ लाखांची फसवणूक

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने १६ जणांची ३५ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींशी तक्रारदाराची ओळख झाली होती. आरोपींचे धनकवडीतील एका इमारतीत कार्यालय आहे. रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख असल्याची बतावणी आरोपींनी केली. तक्रारदाराच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. तक्रारदारासह १६ जणांकडून आरोपींनी ३५ लाख ५३ हजार रुपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलाला नोकरी लावली नाही. तक्रारदाराने विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली कथले तपास करत आहेत.

बिबवेवाडीत घरफोडी

सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला बिबवेवाडीतील सरगम अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून आठ लाख ५९ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने चोरट्यांनी लांबिवल्याची घटना नुकतीच घडली. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ कामथे तपास करत आहेत.
बिबवेवाडी परिसरात घरफोडीचे प्रकार वाढले आहे. पंधरा दिवसांपूर्वी बिबवेवाडीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने लांबविल्याची घटना घडली होती.