पुणे : किरकोळ कारणावरून मोटारचालक डाॅक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत डाॅ. आवेश नासीर खान (वय ३५, रा. एमेरल्ड काउंटी, कोंढवा) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. खान हडपसरमधील उंड्री परिसरातील पेट्रोल पंपावर निघाले हाेते. त्या वेळी आरोपी दुचाकीवरून पेट्रोल पंपाजवळ आले. आरोपींनी दुचाकी आडवी लावून मोटार थांबविली. ‘मोटार जोरात का चालवितो,’ अशी विचारणा करून आरोपींनी डाॅ. खान यांना शिवीगाळ केली. रस्त्यात पडलेला दगड त्यांना फेकून मारला. आरोपींनी कठीण वस्तूने त्यांना मारहाण केली. घाबरलेले डाॅ. खान यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी तपास करत आहेत.

वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांना मारहाण

विमाननगर भागातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर थांबलेल्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत राकेश कैलास घरडे (वय ५२, रा. बलवार आळी, गुरुवार पेठ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश घरडे विमाननगर भागातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात पर्यवेक्षक आहेत. वसतिगृहातील दोन विद्यार्थी १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण केल्यानंतर शतपावली करत होते. त्या वेळी आरोपींनी विद्यार्थ्यांना अडवले. ‘इंग्लिशमध्ये शिवीगाळ का केली,’ अशी विचारणा करून त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यांना सिमेंटचा गट्टूही फेकून मारला. त्यानंतर आरोपी महाविद्यालयाच्या वसतिगृहात शिरले. वसतिगृहात दहशत माजवून विद्यार्थ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद घरडे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत.

दुकानदाराला मारहाण

टायरचे पंक्चर काढण्याचे काम करणाऱ्या दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अब्दुल वली मोहम्मद खान (वय ३७, रा. भागोदयनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पाच ते सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांचे कोंढव्यातील संत गाडगेमहाराज शाळेजवळ दुकान आहे. आरोपी दुकानात शिरले. त्यांनी किरकोळ कारणावरून खान यांना शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. सहायक पोलीस निरीक्षक डोके तपास करत आहेत.