पुणे : खासगी कंपनीतील कर्माचारी महिलेचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध शिवाजीनागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका खासगी वित्तीय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय पीडित महिला शिवाजीनगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेत कामाला आहे.
कंपनीतील कार्यकारी संचालकाने महिलेशी लगट करुन तिचा विनयभंग केला. महिलेचा पाठलाग करुन तिचा छळ केला. याबाबतची तक्रार कोणाला केल्यास कंपनीतून काढून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अन्य संचालकांकडे तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारीची दखल न घेता सूडबुद्धीने दुबईतील कार्यालया बदली केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भूमकर पूल परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तिघे जण जखमी झाले आहेत.अमरजा गोपाळ हांडे (वय ३७, रा. गोकुळनगर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार साहिल सुनील कवडे (वय २२, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी, आंबेगाव) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अमरजा यांची मुलगी अस्मिता (वय १७) हिने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अस्मिता, तिची आई अमरजा आणि भाऊ हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन ९ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास निघाले होते. नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ दुचाकीस्वार साहिल कवडे हा भरधाव वेगाने निघाला होता. दुचाकीस्वार कवडे याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वार अस्मिताला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अमरजा, त्यांचा मुलगा हे जखमी झाले. अमरजा, तसेच दुचाकीस्वार कवडे याला गंभीर दुखापत झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमरजा यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.अपघातात कवडे हा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वार अस्मिता आणि तिच्या भावाला दुखापत झाली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी कवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तूपसौंदर तपास करत आहेत.
नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला धमकावून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. निखिल संदीप जाधव (वय २०, मारुती मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत), ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. महात्मा फुले वाड्याजवळ, महात्मा फुले पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तो आणि त्याची मावस बहीण हे शुक्रवारी (१० एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास नदीपात्रातील रस्त्याने निघाले होते. त्या वेळी आरोपी जाधव आणि गरुड हे दुचाकीवरुन तेथे आला. तक्रारदार तरुणाला आणि त्याच्या मावस बहीणीला कोयत्याचा धाक दाखविला. तरुणाला धमकावून पैसे मागितले. कोयत्याचा धाक दाखवून तरुणाकडून आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये घेतले. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन दोघा आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
