पुणे : वादातून हाॅटेल चालकासह कामगारावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आल्याची घटना वेल्हे तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरात रविवारी रात्री घडली. हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत हाॅटेल मालकासह कामगार जखमी झाला. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी हल्लेखाेरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत हाॅटेल मालक म्हस्कू तानाजी दसवडकर, कामगार दशरथ शिळीमकर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी ओंकार सुरेश इंगुळकर (वय १९), विशाल अप्पा इंगुळकर (वय २४, दोघे रा. सुरवड, ता. वेल्हे, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे
आरोपी इंगुळकर आणि साथीदारांचा चार ते पाच दिवसांपूर्वी कोदवडी फाटा परिसरातील हाॅटेल श्रीनाथचे मालक म्हस्कू दसवडकर यांच्याशी वाद झाला होता. रविवारी (२४ मे) रात्री दहाच्या सुमारास इंगुळकर आणि साथीदार हाॅटेलमध्ये शिरले. त्यांनी हाॅटेल मालक दसवडकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी दसवडकर यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. इंगुळकर यांच्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केला. त्या वेळी हाॅटेलमधील कामगार यांनी शिळीमकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी दसवडकर आणि शिळीमकर यांच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोघ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींबरोब असलेल्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे’, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिक महिलेची फसवणूक
गुंतवणुकीवर दरमहा २० टक्के परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिक महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५० वर्षीय महिला ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय करतात. त्या लोणी काळभोर भागात राहायला होत्या. २०२० मध्ये आरोपींशी महिलेच्या पतीची ओळख झाली. आरोपींचा पुणे मेट्राेशी करार झाला आहे. व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून दिल्यास दरमहा २० टक्के परतावा देण्याचे आमिष त्यांनी महिलेला दाखविले.
सुरुवातीला महिलेने गुंतवणूक करण्यास नकार दिला. आरोपींनी महिलेच्या पतीवर दबाब आणला. त्यानंतर महिलेने २० लाख रुपये गुंतविले. आरोपींनी सुरुवातीला चार महिने दरमहा एक लाख रुपये परतावा दिला. त्यानंतर आरोपींनी परतावा, तसेच गुंतवलेली रक्कम दिली नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.
