पुणे : शहरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी शहरात घरफोडीचे सहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून ६२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आकाश सुभाष (वय २३, रा. दिल्ली. मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) साथीदार जितेंद्र चर्तुवेदी (वय ३२, रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

‘आरोपींनी विश्रामबाग, समर्थ, खडक, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे पाच गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद सदनिकांची पाहणी करुन चोरट्यांनी घरफोडीचे गुन्हे केले होते. शहराच्या मध्य भगात घरफोडीची घटना घडली होती.या गुन्ह्याचा विश्रामबाग पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.

चोरटे पुणे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली. चोरटे पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये वास्तव्यास होते. तेथून ते रेल्वेने उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर चोरटे पुन्हा शहरात आल्याची माहिती पोलीस कर्मचारी आशिष खरात आणि अनिस शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले’, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चौकशीत आरोपींनी शहरात घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६२ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण घोडके, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस कर्मचारी सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, आशिष खरात, जाकीर मणियार, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडाळकर यांनी ही कामगिरी केली.
चौकट

वेशांतर करुन चोरट्यांचा माग

शहरा घरफोडी केल्यानंतर चोरटे उत्तर प्रदेशात पसार झाले होते. पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात पोहोचले. मेरठमधील नयी वस्ती भागात चोरटे वास्तव्यास होते. वेशांतर करुन सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर आणि पोलिसांचे पथक चोरट्यांचा मागावर होते. त्यानंतर आरोपी पुन्हा पुण्यात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक परतले. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा लावून चोरट्यांना पकडले.

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी टोळीशी संबंध

आकाश सुभाष हा सराइत आहे. उत्तर प्रदेशातील सनी गँग या टोळीसाठी तो काम करतो. उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो दिल्लीत वास्तव्यास होता. दिल्लीहून पुण्यात येऊन तो घरफोडीचे गुन्हे करायचे. पुणे स्टेशन परिसरातील लाॅजमध्ये आकाश आणि त्याचा साथीदार जितेद्र चर्तुवेदी हे वास्तव्य करायचे. घरफोडीचा गुन्हा केल्यानंतर ते उत्तर प्रदेशात पसार व्हायचे.