पुणे : मतदार नोंदणी मोहिमेत काम करण्याबाबत आदेशचे पालन न करणाऱ्या कर्वेनगर भागातील महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत कोथरूड विधानसभा मतदार नोंदणी मोहिमेच्या पर्यवेक्षक मनीषा गुलाबाव मातारे (वय ३२) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कर्वेनगर येथील महापालिकेच्या शाळेतील पाच शिक्षक, तसेच एका खासगी मराठी शाळेतील दोन शिक्षक अशा सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलमांन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मातारे या राज्य कर विभागात निरीक्षक आहेत. कोथरूड मतदार संघातील मोहिमेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पर्यवेक्षक म्हणून त्या काम पाहत आहेत. मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सात शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्याबाबत लेखी आदेश दिले होते. या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करत आहेत.

नऱ्हे भागात भरदिवसा घरफोडी; सात लाखांचा ऐवज चोरी

भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लांंबविल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात घडली.

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संपत अशोकराव पाठक (वय ४१, रा. नऱ्हे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे सासरे हे नऱ्हे भागातील साईशांती सोसायटीत राहायला आहेत. ४ जून रोजी ते दुपारी तीनच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा सहा लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. घरफाेडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चित्रीकरणात तीन चोरटे दिसून आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

हडपसर येथील फुरसुंगी भागातील एका सदनिकेतून चोरट्यांनी लॅपटाॅप आणि मोबाइल संच असा ९६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदेश एम. एस. (वय २६, सध्या रा. झोलो विसडम सोसायटी, फुुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदेश हे मूळचे कर्नाटकातील म्हैसुरचे आहेत. चोरट्यांनी सदनिकेतून लॅपटाॅप आणि मोबाइल संच चाेरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करत आहेत.