Pune Airport Customs Hydroponic Ganja Seizure: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या काही महिन्यांत थायलंडहून पाठविण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजा तस्करीचे प्रकार केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) तत्परतेमुळे उघडकीस आले आहेत. गेल्या काही महिन्यांत ३७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. हायड्रोपोनिक गांजाची नशा उच्चभ्रू वर्गात केली जाते.

याची किंमत जास्त असते. गेल्या काही वर्षांपासून या प्रकारच्या गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. उच्चभ्रू वर्गापुरती ही नशा सीमित आहे, असा अर्थ थेट काढता कामा नये. मेफेड्रोन, हायड्रोपोनिक गांजा, गांजाच्या नशेचा विळखा बसू नये, म्हणून तपास यंत्रणांसह सर्वांनीच दक्ष असायला हवे.
गेल्या आठवड्यात विमानतळावरील एअर कार्गो विभागात थायलंडहून आयात करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या डब्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोपोनिक गांजा सापडला.

याची किंमत २६ कोटी ८० लाख रुपये इतकी होती. बँकाॅकहून ‘हायड्रोपोनिक’ गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. प्रवाशांकडून सुमारे दहा कोटी रुपयांचा १३ किलो ७२५ ग्रॅम ‘हायड्रोपोनिक’ गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले प्रवासी हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, गुजरातमधील बलसाड, तसेच पालघर जिल्ह्यातील होते.

‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थांच्या तस्करीचा कस्टमकडून सखोल तपास करण्यात आला. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता या विमानतळावर प्रवाशांची वर्दळ जास्त असते. विमानतळावरील यंत्रणा दक्ष असतात. तुलनेने छोट्या विमानळावरील यंत्रणांना गुंगारा देऊन हायड्रोपोनिक गांजा, तसेच परदेशी चलनाची तस्करी सहज करता येईल, असा समज तस्करांचा असतो. त्यामुळे अमली पदार्थ तस्कर हे छोट्या विमानतळावर तस्करी करून आणलेले अमली पदार्थ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, कस्टमच्या पथकाने तस्करांचे हे प्रयत्न हाणून पाडले,’ अशी माहिती कस्टमच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. गांजा सामान्यांना माहिती असतो. अगदी तंंबाखूप्रमाणे दिसणाऱ्या गांजाचा वास तीव्र असतो. मात्र, हायड्रोपोनिक गांजा काय असतो, याची माहिती सामान्यांना नसते. गेल्या काही वर्षांपासून उच्चभ्रू वर्गात गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. या गांजाची किंमत साध्या गांजापेक्षा जास्त असते.

हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात करण्यात येते. या प्रकारचा गांजा तयार करताना मातीचा वापर न करता पाणी आणि पोषक द्रव्ये यांच्या साह्याने नियंत्रित वातावरणात लागवड केली जाते. त्यामुळे याला ‘हायड्रोपोनिक गांजा’ असे म्हटले जाते. पुणे पोलिसांनी हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आणला होता. खडकी परिसरातून हायड्रोपोेनिक गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणांना अटक करण्यात आली होती. तरुण मूळचे परगावचे होते. पिंपरी परिसरात सदनिका भाडेतत्त्वावर घेऊन ते राहत होते.

पोलिसांनी तरुणांची चौकशी केली. तेव्हा तरुणांनी पिंपरीतील सदनिकेत नियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याची माहिती तपासात दिली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पिंपरीतील सदनिकेतून कोट्यवधी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी उच्चशिक्षित, माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील कर्मचारी, कष्टकरी वर्ग गांजाची नशा करत असल्याचे उघडकीस आले आहे. साधा गांजा सहज उपलब्ध होतो, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष माेहीम हाती घेतली आहे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री होते, अशी ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली आहेत.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. थेट पुरवठदारांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी परराज्यातून विक्रीस पाठविलेला ४८१ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत एक कोटी ७७ लाख ९२ हजार रुपये आहे. गांजा विक्री प्रकरणात २२० जणांना अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांत पुणे पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून १६६ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी २२ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत ८६ लाख ५१ हजार रुपये आहे.

ओडिशा, छत्तीसगड, तसेच आंध्र प्रदेशातील दुर्गम भागात गांजाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परराज्यातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत विशेषत: पुणे-मुंबईसारख्या शहरात गांजा विक्रीस पाठविला जातो. अगदी परराज्यातून दुचाकीवरून गांजाची तस्करी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. शहरातील वसाहती, उच्चभ्रू भागांत साधा गांजा विक्री करणारी एक साखळी कार्यरत आहे. नशेखोरीच्या विळख्यातून तरुणाईची सुटका करण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे.

अमली पदार्थ तस्करीपुरता हा विषय मर्यादित न ठेवता अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेले तरुण, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर व्यापक जनजागृती, समुपदेशन करण्याची गरज आहे. पुणे पोलिसांनी शहरात अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम प्रभावी होण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, खासगी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, तसेच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पाठबळ देणे आवश्यक आहे.

  • rahul.khaladkar@expressindia.com