पुणे : ‘कृषी विभागात ‘कृषीमित्र’ होण्याची संधी’ अशी जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्या प्रकरणी समाज माध्यमातील खातेधारकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभागात कृषीमित्र पदासाठी भरती करण्यात येणार आहे, अशी जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करण्यात आली. कृषीमित्र हे पद कृषी विभागात अस्तिवात नाही.
समाज माध्यमातील एका खात्यातून ही जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. या जाहिरातीत एक मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. शासकीय नोकरीसाठी संपर्क साधा, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. या जाहिरातीत कृषी मंत्र्यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. कृषी विभागाच्या नावे बनावट जाहीरात प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची सायबर चाेरट्यांनी ५७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विमाननगर भागात राहायला आहेत. ते एका खासगी कंपनीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी ५७ लाख १० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिलाा नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
