पुणे : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना भागातील एका डाॅक्टरांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ८७ वर्षीय डाॅक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टर हे डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २४ मे रोजी तक्रारदार डाॅक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. मुंबई पोलिसांनी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर घाबरलेल्या डाॅक्टरांनी चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात ४६ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चोरट्यांनी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
बँक अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे बाणेर परिसरात राहायला आहेत. रविवारी (३१ मे) सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खात्याची माहिती अद्ययावत करायची आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ही लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून चार लाख दहा हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिलारे तपास करत आहेत.
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक
ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगाव परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. सुरुवातीला महिलेला एक काम दिले. त्यानंतर महिलेला या कामात पैसे गुंतविल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात चार लाख चार हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेल परतावा दिला नाही. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.
दरम्यान, क्रेडीट कार्डचे कुपन देण्याचे आमिष दाखवून खराडी भागातील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी तीन लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पालेकर तपास करत आहेत.
