ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचं जाळं दिवसेंदिवस अधिकच घातक बनत चालले आहे. पुण्यातील खेड तालुक्यातून असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय,” अशी खोटी ओळख सांगून सायबर भामट्यांनी एका ७४ वर्षीय निवृत्त महिला शिक्षिकेला आणि त्यांच्या पतीला तब्बल महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली घरातच ओलीस ठेवलं. अटकेची भीती दाखवून या दाम्पत्याची तब्बल ६८ लाख ८० हजार रुपयांची जीवनभराची जमापुंजी लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल अन्….
२९ जुलै रोजी या पीडित महिला शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने अंगावर पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यातून ‘सब-इन्स्पेक्टर संदीप राव’ बोलत असल्याचे सांगत त्याने थेट भीती दाखवण्यास सुरुवात केली. “तुमच्या खात्यावरून २ कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाले असून तुमच्यावर गुन्हा दाखल होत आहे,” असा बनाव भामट्याने रचला. पीडित महिलेने असे कोणतेही बँक खाते किंवा व्यवहार नसल्याचे ठणकावून सांगितले, परंतु सायबर गुन्हेगारांनी त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्यास सुरुवात केली.
विश्वास नांगरे पाटीलांच्या नावानं दोन तास समुपदेशनाचा बनाव
यानंतर हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करत असल्याचे भासवत दुसऱ्या भामट्याला कॉलवर घेण्यात आले. “मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय,” असे सांगत बनावट अधिकाऱ्याने सुमारे दोन तास या दाम्पत्याशी संवाद साधला. या काळात घाबरलेल्या वृद्ध दाम्पत्याकडून त्यांच्या बँक खात्यांमधील शिल्लक, पोस्टातील ठेवी, एलआयसी (LIC) पॉलिसी आणि सोन्याच्या दागिन्यांची संपूर्ण माहिती काढून घेण्यात आली. वृद्धत्वामुळे मुंबईला येणे शक्य नसल्याचे सांगताच, “आम्ही तुम्हाला मदत करतो, तपासासाठी सर्व पैसे दिलेल्या सरकारी खात्यात जमा करा, पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे परत मिळतील,” असे आमिष दाखवण्यात आले.
दर दोन तासांनी ‘I am safe at home’ मेसेजचे फर्मान!
अटकेच्या भीतीने ग्रासलेल्या या दाम्पत्याने सुरुवातीला पोस्टातील ४० लाख रुपयांच्या ठेवी भामट्यांच्या खात्यात वर्ग केल्या. त्यानंतर घरातील सोने गहाण ठेवून मिळालेली रक्कमही जमा करण्यास भाग पाडले गेले. एवढ्यावरच न थांबता, सायबर भामट्यांनी या दाम्पत्याला घरातच बंदिस्त राहण्याची आणि दर दोन तासांनी “I am safe at home” (मी घरात सुरक्षित आहे) असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवण्याची सक्ती केली. घराबाहेर पाऊल टाकल्यास थेट तुरुंगात डांबले जाईल, अशी धमकीही देण्यात आली. पुढे पैसे परत मागितल्यावर खटला अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून एलआयसी पॉलिसी मोडून उर्वरित रक्कमही उकळण्यात आली. अशा प्रकारे २९ जुलै ते १ सप्टेंबर दरम्यान या दाम्पत्याला ६८.८ लाख रुपयांना गंडवण्यात आले.
टीव्हीवर खऱ्या विश्वास नांगरे पाटलांना पाहिलं अन् गुपित उघडलं!
महिन्याभराच्या या मानसिक छळानंतर ४ सप्टेंबर रोजी सत्य समोर आले. टीव्हीवर दहीहंडी उत्सवाच्या बातम्या पाहताना पीडित दाम्पत्याने खरोखरचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना पाहिले. त्यांचा चेहरा आणि आवाज भामट्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे लक्षात येताच त्यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. दाम्पत्याने तात्काळ खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सध्या पोलिस या बँक खात्यांचा आणि फोन क्रमांकांचा तांत्रिक तपास करत आहेत.
‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे नक्की काय?
सध्या सायबर भामटे ‘डिजिटल अरेस्ट’ या नवीन क्लृप्तीचा वापर करत आहेत. यामध्ये सीबीआय (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) किंवा पोलिस अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना घाबरवले जाते. बेकायदेशीर पार्सल, मनी लाँड्रिंग किंवा ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याचे सांगून पीडिताला कॅमेऱ्यासमोरच बसून राहण्यास भाग पाडले जाते.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणतीही तपास यंत्रणा किंवा पोलिस अधिकारी अशा प्रकारे व्हिडिओ कॉलवरून अटक करत नाहीत किंवा पैसे भरण्यास सांगत नाहीत. अशा प्रकारचा कोणताही संशयास्पद कॉल आल्यास न घाबरता तात्काळ स्थानिक पोलिसांशी किंवा १९३० या सायबर हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा.
