पुणे : पाणीपट्टी थकल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी विमाननगर भागातील एका डाॅक्टर महिलेची तीन लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका डाॅक्टर महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५९ वर्षीय डाॅक्टर महिला विमाननगर भागात राहायला आहेत. साकोरेनगर भागातील बंगल्यात त्यांचा दवाखाना आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर चार महिन्यांपूर्वी संपर्क साधला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून बोलत असल्याची बतावणी सायब चोरट्यांनी केली. पाणीपट्टी न भरल्याने पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली. या लिंकच्या माध्यमातून महिलेला दहा रुपये ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे भरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी महिलेला डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगितले. चोरट्यांनी डेबिट कार्डची माहिती घेतली. गोपनीय माहिती, सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून परस्पर तीन लाख ६८ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पाेलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत.
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तरुणाची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची दोन लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार २७ वर्षीय तरुण कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहायला आहे. तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहेत. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी तरुणाला या कामात गुंतवणूक केल्यास २० ते ३० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाला पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करत आहेत.
महागडा मोबाइल देण्याच्या आमिषाने महिलेला गंडा
महागडा मोबाइल संच कंपनीकडून भाग्यवान ग्राहकांना देण्यात येणार असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी एका महिलेची दोन लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता भागात असलेल्या रेल्वे कर्मचारी वसाहतीत राहायला आहेत. समाज माध्यमातील एक जाहीरात त्यांनी पाहिली. भाग्यवान ग्राहकाने कंपनीकडून महागडा मोबाइल संच देण्यात येणार आहे ,असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर महिलेला सुरुवातीला काही रक्कम जमा करावी लागेल, असे सांगण्यात आले. महागडा मोबाइल संच, तसेच भेटवस्तूंच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची ऑनलाइन पद्धतीने दोन लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे तपास करत आहेत.
