पुणे : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, १९ ऑक्टोबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तक्रारदाराकडून वेळोवेळी एकूण एक कोटी एक लाख ६१ हजार ८४५ रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यात आले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले.

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक  

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका आयटी व्यावसायिकाची तब्बल ४९ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार लोहगाव परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमोल सुरेश चौधरी (वय ३५) यांनी तक्रार दिली असून, युट्युब लिंकद्वारे संपर्क साधणारे अज्ञात व्यक्तीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून विश्वासात घेतले. त्यानुसार तक्रारदाराकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये एकूण ६३ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. या गुंतवणुकीच्या बदल्यात आरोपींनी केवळ १३ लाख १५ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता टाळाटाळ करत अखेरीस फसवणूक केल्याचे उघड झाले. पुढील तपास लोहगाव पोलिस करत आहेत.

जेल केटरिंग कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक

सरकारी संस्थांमध्ये ओळख असल्याचे सांगत पुणे मध्यवर्ती कारागृहाचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संग्राम पांडुरंग वाघ (वय ३१, रा. कुमार पिकासो, डी. पी. रस्ता, हडपसर) यांनी तक्रार दिली असून, नवी मुंबईतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे याने तक्रारदाराशी ओळख वाढवून सरकारी संस्थांमध्ये मोठी ओळख असल्याचे भासवले. तसेच पुणे मध्यवर्ती कारागृहाचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट भागीदारीत घेण्याचा प्रस्ताव दिला. निविदा भरल्यास कंत्राट निश्चित मिळेल, तसेच आवश्यक परवानगी आपल्या ओळखीमुळे सहज मिळतील, असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने तक्रारदाराकडून वेळोवेळी आरटीजीएस आणि रोख स्वरूपात एकूण ११ लाख रुपये उकळले. मात्र, कंत्राट मिळवून देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. हा प्रकार ८ सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२५ या कालावधीत घडला असून, १ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.