पुणे : लष्करासाठी साहित्य पुरविण्याचे आहे, अशी बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका तरुणाची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात राहायला आहे. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लष्कराला साहित्य पुरवायचे आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून चाेरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ६५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ६५ लाखांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जानेवारी महिन्यात ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात त्यांनी चोरट्यांच्या खात्यात २० लाख ६० हजार रुपये जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी आणखी एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे धायरीत राहायला आहेत. तक्रारादाराला शेअर बाजारात गुंतवणुकीच आमिष चोरट्यांनी दाखविले होते. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी ४५ लाख २५ हजार रुपये जमा केले. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

एपीके फाइल पाठवून ज्येष्ठाची फसवणूक

एपीके फाइल पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठाची एपीके फाइल पाठवून तीन लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चोरट्यांनी तक्रारदार ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाइल पाठविली होती. देयक थकीत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. फाइल उघडताच चोरट्यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक ‘हॅक’ केला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला असल्याने चोरट्यांनी तांत्रिक फेरफार करुन खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.