पुणे : कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ महिला संतनगर परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी अटकेची भीती दाखविली.
अटक टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, तसेच तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगितले. चाेरट्यांनी भीती दाखविल्याने तक्रारदार महिला घाबरल्या त्यांनी शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात ८ ते १५ एप्रिल या कालावधीत वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांच्या खात्यात एकूण मिळून ४३ लाख सात हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करत आहेत.
गेल्या वर्षभरापासून ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सीबीआय अशा केंद्रीय तपास संस्थांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची ३३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ४३ वर्षीय व्यावसायिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तक्रारदार व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांना एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने हे काम पूर्ण केल्यानंतर खात्यात पैसे जमा झाल्याचे भासविले. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच मूळ रक्कमही परत देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी २७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय व्यावसायिक हे रविवार पेठेत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता, तसेच त्यांना गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.
