पुणे : गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांची १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मार्केट यार्ड आणि नऱ्हे पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत, सायबर चोरांनी बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, मार्केट यार्ड येथील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दूरध्वनी करून तुमच्या गॅसचे बिल भरले नाही तर ते गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवली. तसेच व्हॉट्सअप वर बिल न भरल्याबाबतची नोटीस पाठवली. त्यामध्ये एक लिंक देखील होती. ज्येष्ठ नागरिकाने लिंक क्लिक करून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यातून २९ हजार रुपये वळते (डेबिट) झाले. ९ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर ज्येष्ठाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नवले पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत धायरी परिसरातील नऱ्हे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी ९ एप्रिल रोजी गॅस बिल भरण्याचे सांगत एक एपीके फाईल पाठवली. त्यांनी ती लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार ५८७ रुपये वळते (डेबिट) झाले. त्यानंतर तक्रारदाराने नऱ्हे पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात तक्रार दिली. पोलीस कर्मचारी सोनकांबळे पुढील तपास करत आहेत.
जादा परताव्याचे आमिष दाखवत एकाची ३६ लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवत सायबर चोरांनी एकाची ३६ लाख ६३ हजार ९९८
रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विमाननगर येथील ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी ते २३ मार्च या कालावधीत सायबर चोरांनी तक्रारदार महिलेला दूरध्वनी करून शेअर
ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. सायबर चोरांवर विश्वास ठेवत महिलेने ३६ लाख ६३ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानी फिर्याद दाखल केली असून पोलिस निरीक्षक (गुन्हे) शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
