पुणे : सायबर गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम चोरटे स्वत:च्या नावे वेगवेगळ्या बँकांत उघडलेल्या बँक खात्यात जमा करतात. केंद शासनाच्या ‘समन्वय’ या पोर्टलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या व्यवहारांचा शोध घेण्यात (मनी ट्रेल) येत आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर संबंधित बँक खाती गोठविण्यात येत आहेत. शासनाने आता अशा बँक खात्यांची पडताळणी करून ही बँक खाती नेमकी कोणत्या शहरात आहेत, तसेच खातेधारकांचे नाव, पत्ते आणि मोबाइल क्रमांक तपासले जात असून, त्याचे विश्लेषण केल्यानंतर परराज्यांतील पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ‘समन्वय’ पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील सायबर गु्न्ह्यांच्या तपासाला गती मिळाली आहे.
पुणे पोलिसांकडून अशा प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंढव्यातील एका खासगी बँकेत देशातील वेगवेगळ्या शहरांत राहणाऱ्या सात जणांची फसवणूक करण्यात आलेली रक्कम जमा करण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम फुरसुंगी परिसरातील एका बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली. या बँकेच्या खात्यातून फसवणुकीतील रक्कम अन्य खात्यांत वळविण्यात आली होती. असेच प्रकार शहरातील अन्य बँकांत झाले होते. सायबर फसवणुकीतील रक्कम अन्य बँकांच्या खात्यात वळविण्यात आली होती. सायबर गुन्ह्यांचा तपास करताना समन्वय पोर्टलवरील नोंदविण्यात आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यात येते. आर्थिक व्यवहारांचा शोध (मनी ट्रेल) घेतला जातो.
सायबर फसवणुकीच्या पोर्टलवर तक्रार नोंदविताना ज्या बँक खात्यात फसवणुकीतील रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अशा बँक खात्यांची माहिती दिली जाते. ही बँक खाते बनावट कागदपत्रांचा वापर (म्यूल) काढलेली असतात. सायबर चोरटे फसवणूक करताना एकाच वेळी पाच ते सहा बँक खात्यात तक्रादारांना पैसे जमा करण्यास सांगतात. सायबर गु्न्हा दाखल झाल्यानंतर संबंधित खाते गोठविण्यात येते. हे बँक खाते कोणत्या शहरातील बँकेत आहे, तसेच खात्यातील पत्ता, मोबाइल क्रमांक तपासले जातात. याबाबतची माहिती संकलित केल्यानंतर संबंधित राज्यातील पोलिसांना दिली जाते. अशा प्रकरणात पुण्यातील दहापेक्षा जास्त पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर फसवणुकीतील रक्कम ज्या खात्यात जमा करण्यात आली आहे. अशा खातेधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
‘समन्वय’ पोर्टल म्हणजे काय?
‘समन्वय’ पोर्टल (सिनेरजाईज्ड ॲनालिसिस फाॅर मॅनेजिंग आणि माॅनेटरिंग सायबर क्राइम) हे केंद्र शासनाच्या सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून सुरू करण्यात आले आहे. देशभरात दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये झालेले बँक व्यवहार, संशयास्पद बँक खाती, मोबाइल क्रमांक, आयपी ॲड्रेस, आर्थिक व्यवहारांचा मागोवा किंवा साखळी (मनी ट्रेल) याबाबतचे विश्लेषण करून विविध राज्यांतील पोलिसांच्या परस्परसमन्वयाने कारवाई करण्यासाठी हे पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे एका राज्यात उघडलेले बँक खाते हे दुसऱ्या राज्यात फसवणुकीसाठी वापरले जात असल्यास त्याचा शोध घेण्यात येतो.
‘समन्वय’ पोर्टलच्या माध्यमातून सायबर गु्ह्यांच्या तपासाला गती मिळाली आहे. देशभरातील पोलीस यंत्रणा या पोर्टलच्या माध्यमातून परस्परसमन्वय साधून फसवणुकीतील गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचत आहेत. संबंधित बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया, तसेच फसवणुकीसाठी वापरलेली बँक खाते, बनावट बँक खात्यांची माहिती घेऊन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. – विवेक मासाळ, पोलीस उपायुक्त, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखा, पुणे पोलीस
