पुणे : लोन ॲपच्या माध्यमातून तरुणाची बदनामी करण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्याकडून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका २९ वर्षीय तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर जानेवारी महिन्यात चोरट्यांनी संपर्क साधला. तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या चोरट्यांनी आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकाचा वापर केला होता.
आराेपींनी त्याला लोन ॲपवरुन काढलेल्या कर्जाचे पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांनी तरुणाच्या छायाचित्रात तांत्रिक फेरफार करुन समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती. हे छायाचित्र परिचितांना पाठविण्यात येईल, असे सांगून त्याच्याकडून पैसे उकळले, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे.
चोरट्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने मुंडवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.
लोन ॲपच्या धमकीमुळे आत्महत्या
ऑनलाइन पद्धतीने लोन देणाऱ्या काही ॲपच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी शहर परिसरात फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. लोन ॲपच्या माध्यमातून धमकावून अनेकांकडून चोरट्यांनी पैसे घेतले होते. छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती. अनेकांनी निमूटपणे पैसे भरले होते. धमकीमुळे सहकारनगर, पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन तरुणांनी आत्महत्या करण्याची घटना घडली होती. एका युवतीने धमकीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची १६ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची १६ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १६ लाख ७० हजार रुपये जमा केले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर गायकवाड तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तरुणाची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षीय तरुण मांजरी भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका हाॅटेलला दर्शक पसंती (व्ह्यूज) मिळवून द्यायची आहे, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले.
त्यानंतर चोरट्यांनी त्याला पैसे गुंतविण्यास सांगितले. गेल्या महिनाभरात चोरट्यांच्या खात्यात तरुणाने पाच लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर जास्त परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते. तरुणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आाल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करत आहेत.
