पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी निवृत्त अभियंत्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निवृत्त अभियंत्याने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६६ वर्षीय निवृत्त अभियंता कोथरूड परिसरातील गणेशनगर भागात राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त अभियंत्याने जानेवारी महिन्यात समाजमाध्यमात एक जाहीरात पाहिली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी जाहिरातीत दाखविले होते. कमी कालावधीत जास्त परतावा, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळण्याच्या मोहापायी निवृत्त अभियंत्याने जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविले. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक, तसेच व्यवहााबाबत एक ॲप उघडण्यास सांगितले. तक्रारदाराने ॲप सुरू केले. ॲपमध्ये गुंतवणुकीवरील परताव्याची माहिती देण्यात आली होती.
तक्रारदारांना जाळ्यात ओढून चोरट्यांनी विविध बँक खात्यात पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी गेल्या चार महिन्यात टप्याटप्याने चोरट्यांच्या बँक खात्यात दाेन कोटी तीन लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांनी ॲप उघडले. तेव्हा गुंतवणुकीवर चांगला परातावा मिळाल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात त्यांच्या बँख खात्यात परतावा जमा करण्यात आला नव्हता. परतावा मिळविण्यासाठी त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा विविध प्रकारचे शुल्क आणि कर भरावा लागेल, असे सांगितले. चोरट्यांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
आयुष्यभराची पुंजी चोरट्यांच्या हवाली
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तसेच ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आयुष्यभर पै-पै करुन जमा केलेली रक्कम ज्येष्ट नागरिक चोरट्यांच्या हवाली करतात. सायबर चोरट्यांच्या आमिषांना बळी पडू नये. असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
