पुणे : महागड्या मोबाइल संच खरेदीवर दहा हजार रुपयांची सूट देण्याच्या आमिषाने एका तरुणाची सायबर चोरट्यांनी तब्बल ४६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, तक्रादार ३५ वर्षीय तरुण कात्रज भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘ सध्या बाजारातील महागड्या मोबाइल संच खरेदीवर दहा हजार रुपयांची सूट देतो’, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. त्यानंतर मोबाइल खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, असे चोरट्यांनी तरुणाला सांगितले. तरुणाला आमिष दाखवून चोरट्यांनी जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ४६ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मद्य विक्री परवाना देण्याच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक

मद्य विक्री दुकानाचा परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ३७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जाॅन जोसेफ त्रिभूवन (वय ५३, रा. लष्कर), ज्ञानेश्वर मावडीकर (वय ६२, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक हे बोपोडी परिसरात राहायला आहेत. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी ओळखीचे आहेत. मद्य विक्री दुकानाचा परवाना मिळवून देतो, असे आमिष दोघांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर दोघा आरोपींनी मद्य विक्री परवाना मिळवून देण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात २७ लाख ६८ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर परवाना मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.