पुणे : सायबर गु्न्ह्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट बँक खात्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आतापर्यंत १३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेऊन महाराष्ट्र सायबर गुन्हे शाखा, तसेच नवी दिल्लीतील इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर नागरिकांना जलद प्रतिसाद देण्यासाठी विविध पोर्टल सुरू करण्यात आली. ‘एमआरएम’ (मनी रिस्टोरेशन माॅड्युल) हे पोर्टल सुरू करण्यात आले. फसवणूक झालेली रक्कम त्वरित मिळवून देण्यासाठी या ‘पोर्टल’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात. या पोर्टलवर नोंदणी केल्यास फसवणुकीची रक्कम त्वरित परत मिळवून देण्यासाठी बँकेशी संपर्क साधला जातो. या पोर्टलच्या माध्यमातून २३५८ तक्रारींची पडताळणी कण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.

‘ई झिरो एफआय पोर्टल’वर पाच लाखांवरील आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंदवून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. या पोर्टलद्वारे पोलीस ठाण्याच्या कायक्षेत्राचा अडसर येत नाही. तक्रारी त्वरित नोंदवून तपास सुरू करण्यात येतो. जुलै महिन्यात या पोर्टलच्या माध्यमातून २७ तक्रारी दाखल करण्यात आल्या.

‘जीआरएम’ (ग्रिव्हएन्स रिड्रेसल माॅड्युल) या पोर्टलच्या माध्यमातून एखाद्या सायबर गुन्ह्यात चोरट्यांनी पैसे जमा केले असतील. त्या व्यक्तीचा काही संबंध नसेल, तर गाेठवलेले खाते पूर्ववत करण्यासाठी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘समन्वय’ पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील विविध शहरांतील पोलीस यंत्रणा संपर्कात आल्या असून, माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. २०२४ पासून या पोर्टलच्या माध्यमातून १५२ सायबर गु्न्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

‘देशभरातील सायबर गु्न्हेगारांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. जेणेकरून या माहितीचा वापर तपासासाठी होईल’, असे सायबर पोलिसांनी सांगितले. ‘सायबर क्राईम इनव्हेस्टिगेशन आसिस्टन्स रिक्वेस्ट’ पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवा देणारे घटक, बँका, दूरसंचार कंपन्या, डिजिटल प्लॅटफाॅर्मचे संचालकांच्या संपर्कात पोलीस आहेत. ‘सहयोग’ पोर्टलच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे संदेश काढून टाकण्याचे काम केले जाते. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत ८४५ तेढ निर्माण करणारे संदेश काढून टाकले आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करण्यासाठी पोलिसांकडून शाळा, महाविद्यालये, सोसायटी, सरकारी कार्यालये, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यात कार्यक्रम घेतले आहेत.