पुणे : ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची दहा काेटी ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या टोळी प्रमुखाला सायबर पोलिसांनी अटक केली.
रोहन रामेश्वर जाधव (वय २६, रा. गजानन अपार्टमेंट, पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाधव हा फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या आधार कार्डचा गैरवापर करून जानेवारी महिन्यात एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यात आले होते. आरोपींनी त्यांच्याकडे ‘सीबीआय’मधील अधिकारी असल्याची बतावणी केली होती. ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकडून दहा कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये चोरट्यांनी उकळले. चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले होते.
तांत्रिक तपासात फसवणुकीतील रकमेपैकी ७५ लाख रुपये एका बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले होते; तसेच अन्य एका बँकेतील वेगवेगळ्या खात्यांत सहा लाख ६० हजार रुपये वळविण्यात आले होते. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे तपास करून पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (वय २६, रा. कर्वेनगर), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, सध्या रा. कर्वेनगर), अमर अत्तरगी (वय २४, रा. महात्मा फुले वसाहत, मोदीखाना, सोलापूर) यांना अटक केली होती. या प्रकरणातील एक आरोपी प्रणव करणसिंग आर्या (वय ३१, रा नोएडा, दिल्ली) हा पसार झाला आहे. तपासात रोहन जाधव हा या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती मिळाली. त्याने फसवणूक करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यातून २९ गुन्ह्यांचा शोध लागला. आंतराष्ट्रीय स्तरावरील हॅकर्सशी त्याचा संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पण, जाधव फरार झाला होता.
न्यायालयाने जाधवविरुद्ध अजामीनपात्र अटक वाॅरंट बजावले. त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याचे बँक व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण, अन्य आरोपींशी असलेले संबंध याबाबतची माहिती मिळवली. त्यानंतर जाधव याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
जाधव मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असून, २०२२ पासून तो पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास होता. समाज माध्यमात तो रीलस्टार म्हणून प्रसिद्ध होता. जाधव विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एक कोटी ३४ लाख रुपयांची रक्कम गोठविली आहे. पाच हजार ४३६ बँक खात्यांत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणातील रक्कम वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, आर्थिक आणि सायबर गुन्हे विभागाचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि पथकाने ही कारवाई केली.
