पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड, नांदेड सिटी, बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाकडे गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी पाच लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. १९ जून रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. गॅस देयक थकीत असून, देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी त्यांना एपीके फाईल पाठविली. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख ४२ हजार रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.

नांदेड सिटीत राहणाऱ्या एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी चार लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेे. सायबर चोरट्यांनी त्यांना बँकेकडून पेन्शन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी करुन त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात वर्ग केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

बाणेर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एपीके फाईल पाठवून पाच लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावरुन एक एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी खात्यातून पैसे काढून घेतले. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.