पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची एक कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५८ वर्षीय व्यावसायिक मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी व्यावासायिकाच्या समाज माध्यमातील खात्यावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर व्यावासायिकाला समाज माध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले. शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजना, तसेच परताव्याबाबतची माहिती चोरट्यांनी त्यांना दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले.
व्यावसायिकाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी २१ लाख ९२ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचा संदेश पाठविला. मात्र, त्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा केली नव्हती. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संदेश पाठविला, चोरट्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या आठवड्यात सायबर चोरट्यांनी मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ट नागरिकाची तब्बल ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
दंडात्मक कारवाईचे चलन पाठवून फसवणूक
प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई (ई-चलन) करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईची पीडीएफ फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची चार लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसरमधील फुरसुंगी परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर दंडात्मक कारवाईची पीडीएफ फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्याचा मोबाइलम क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला होता. चोरट्यांनी मोबाइल क्रमांक हॅक करुन तरुणाच्या खात्यातून रोकड लांबविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.
