पुणे : सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधला. एका खासगी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा पाॅलिसी सुरू करण्यात आली. या पाॅलिसीत पैसे गुंतविल्यास फायदा होईल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याने सांगितलेल्या बँक खात्यात वेळावेळी पाच लाख ३७ हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर परतावा देण्यात येईल, असे चोरट्याने त्यांना सांगितले होते. परताव्याबाबत ज्येष्ठाने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्कसाधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद होता. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिलारे तपास करत आहेत.
ज्येष्ठाच्या बँक खात्यातून रोकड लंपास
ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून चोरट्याने खात्यातून एक लाख ९८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्यााची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे लोणी काळभोर भागात राहायला आहेत. तक्रारदार हे २२ मे रोजी लोणी काळभोमधील नायगाव फाटा येथे मोटारीतून गेले होते. त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला लावली होती. चोरट्यांनी मोटारीतील मोबाइल संच चोरला. ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी मोबाइलमधील माहितीचा गैरवापर करुन ज्येष्ठाच्या बँक खात्यातून एक लाख ९८ हजार रुपये काढून घेतले. खात्यातून रोकड चोरीला गेल्याचा प्रकारु उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद पन्हाळे तपास करत आहेत.
सोसायटीच्या आवारात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
सोसायटीच्य आवारात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली.
याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय महिला भारती विद्यापीठ परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (३० मे) दुपारी तीनच्या सुमारास त्या सोसायटीच्या आवारातून निघाल्या होत्या. त्या वेळी सोसायटीच्या आवारात एक चोरटा शिरला. सोसायटीच्या आवारात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर चोरटा दुचाकीवरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चाेरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
