पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांची तीन कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बतावणीने सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. दुसऱ्या एका घटनेत सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून कोथरूडमधील एका ज्येष्ठ महिलेची एक कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याची बतावणी करुन सहकारनगरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक करण्याात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी चोरट्यांनी संपर्क साधला होता. चोरट्यांनी त्यांना संदेश पाठविला होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

त्यानंतर चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी ५२ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

बँक खात्याचा काळ्या पैसे व्यवहारात वापर झाला असून, या प्रकरणात कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची एक कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत ७७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहेत. बँक खात्याचा काळ्या पैसे व्यवहारात वापर झाला असून, २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे द्यावे लागतील, अशी भीती दाखवून चोरट्यांनी त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. वीस दिवसात चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी ६२ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर चोरट्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम गोठविण्याची विनंती बँकेकडे करण्यात येणार आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

आयुष्यभराची पुंजी चोरट्यांच्या खात्यात

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळी आमिषे, तसेच कारवाईची भीती दाखवून चोरट्यांकडून फसवणूक केली जाते. आयुष्यभर पै-पै करुन साठविलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा केली जाते. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.