पुणे : गॅस टंचाईनंतर वाहिनीद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या (पीएनजी) गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून कोथरूड भागाातील एका ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता.
गॅस देयक थकीत असून, पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवावे लागतील, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. मोबाइल क्रमांक ‘हॅक’ केला.
मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात असल्याने चोरट्यांनी बँक खात्यातील आठ लाख ५१ हजार रुपयांची रोकड दुसऱ्या एका खात्यात जमा करुन घेतली. खात्यातून पैसे काढण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.
बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात माॅडेल काॅलनीत राहणाऱ्या एका नागरिकाची सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली होती. गॅस, वीज पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोेलिसांकडून करण्यात आले आहे.
भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्यात येणार असल्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइलवरील गेम जिंकल्याने तुम्हाला महागड्या भेटवस्तू पाठविण्यात येणार आहेत. महागडा मोबाइल संच, चामड्याची पिशवी अशा भेटवस्तू पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले.
त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी त्यांना भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. तक्रारदार ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लोंढे तपास करत आहेत.
