पुणे : मतदार यादी दुरुस्ती अर्जात (एसआयआर फाॅर्म) चूक झाल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहायला आहेत. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ३० जुलै रोजी संपर्क साधला. ‘मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, तुम्ही भरलेल्या मतदार यादी दुरुस्ती अर्जात चूक झाली आहे,’ असा संदेश सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर समाज माध्यमातून एक फाॅर्म पाठविला. ‘या फाॅर्मसाठी पाच रुपये भरावे लागतील,’ असे सांगून चोरट्यांनी त्यांना एपीके फाइल पाठविली. एपीके फाइलमध्ये बँक खात्याची माहिती भरावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी एपीके फाइलमध्ये बँक खाते क्रमांक; तसेच अन्य माहिती भरल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेतला.
सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून चार लाख ४३ हजार रुपये काढून घेतले. खात्यातून काढण्यात आलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जमा केली. खात्यातून रक्कम काढण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे. सायबर चोरट्यांनी ज्या खात्यात पैसे वळविले, त्या खात्याची माहिती घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.
अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओ’द्वारे फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड
केद्रीय अर्थमत्री निर्मला सीतारामन यांची बनावट चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करुन फसवणूक करण्याची आणखी एक घटना उघडकीस आली. सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठ महिलेची आठ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविणारी चित्रफीत सायबर चोरट्यांनी समाज माध्यमात प्रसारित केली होती.
कोथरूड भागातील गुरुगणेशनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ही चित्रफीत पाहिली. त्यानंतर चित्रफितीतील सायबर चोरट्यांच्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात आठ लाख रुपये जमा केले. दरम्यान, संबंधित चित्रफीत कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करुन तयार केल्याचे उघडकीस आले. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. अशा प्रकारे सायबर चाेरट्यांनी शहरातील एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.
