पुणे : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची दररोज लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे बांधकाम व्यावसायिकाला साडेचार कोटी रुपये परत मिळाले.
शहरातील एका व्यावसायिकाला बांधकामसाठी पोलाद हवे होते. व्यावसायिकाने संकेतस्थळावर पोलाद विक्री व्यवसायाबाबतची माहिती घेतली. पोलाद पुरवठा करणाऱ्या व्यवासायिकाची माहिती घेत असताना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. राजस्थानातून बोलत असून, पोलाद पुरवठा करण्याचा व्यवसाय असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. पोलाद पुण्यात पाठविण्यासाठी पहिले पैसे पाठवावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर एका मध्यस्थाने दोन बँक खात्याचे क्रमांक व्यावसायिकाला पाठविले. त्यानुसार व्यावसायिकाने एका बँक खात्यात दोन कोटी २७ लाख रुपेय, तसेच दुसऱ्या बँक खात्यात दोन कोटी २७ लाख रुपये पाठविले. चोरट्यांच्या खात्यात व्यावसायिकाने एकूण मिळून चार कोटी ५४ लाख रुपये भरले.
चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने त्वरीत ऑनलाइन पद्धतीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि पथकाने तपास सुरु केला.
‘दोन बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. खातेधारकांना याबाबतची माहिती नव्हती. पोलिसांनी बँकेला संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम अन्य बँक खात्यात वर्ग करु नये, अशी विनंती केली. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आलेे होते. त्या बँक खातेदारांना पैसे व्यावसायिकाच्या खात्यात आरटीजीएस सुविधेद्वारे पैसे पुन्हा जमा करण्यास सांगितले’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली. पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाचे पैसे परत मिळाले. व्यावसायिकाने पोलिसांचे मनोमन आभार मानले.
सायबर चोरट्यांकडून ६७ लाखांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ६७ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वेनगर भगातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअ बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने चोरट्यांनी १८ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ३२ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास (ऑनलाइन टास्क) चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची पाच लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने कााळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चाेरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यंनी महिलेला दाखविले होते. महिलेला परतावा देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी पाच लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केली.
हडपसर भागातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
