Ganesh Atharvashirsha Path: देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालं आहे. लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘बाप्पा मोरया’ या जयघोषात घरोघरी बाप्पाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळत आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिला अथर्वशीर्ष पठण करतात.

या अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमाला आता ४० वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पहाटेच्या सुमारास हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारे सामूहिक अथर्वशीर्ष पठण हा सोहळा नेमकं काय आहे? हा उपक्रम कधी आणि कोणी सुरू केला होता? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

अथर्वशीर्ष पठण उपक्रम काय आहे?

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हजारो महिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात एकत्र येतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीनंतरच या उपक्रमाची सुरुवात होते आणि सकाळी ६ वाजेपर्यंत विविध वयोगटांमधील ३० हजारांपेक्षा जास्त महिला या सोहळ्यात सहभागी होतात.

सणासुदीच्या पारंपरिक वेशभूषेत, रंगीबेरंगी नऊवारी साड्या आणि नाकात नथ परिधान केलेल्या या महिला येथे भगवान गणेशाच्या ‘अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्राच्या सामूहिक पठणात सहभागी होतात. पुण्यातील मंडईपासून ते लाल महालापर्यंतचा रस्ता व्यापून टाकणारे महिलांचे हे अथर्वशीर्ष पठण गणेशोत्सवातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दृश्य असतं. हा उपक्रम आता एक परंपरा बनला असून याला चार दशकं पूर्ण होत आहेत.

हा उपक्रम कोणी सुरू केला?

“अरुण भालेराव आणि त्यांच्या पत्नी शुभांगी भालेराव यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिलांच्या एका सामूहिक उपक्रमाची कल्पना मांडली होती. महिलांमध्ये उत्साह आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या सांस्कृतिक परंपरेत सहभागी होण्याची प्रेरणा निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश होता. या स्तोत्राच्या पठणामुळे मन प्रसन्न व एकाग्र होतं, वाणी स्पष्ट होते आणि अनेक आपल्याला लाभ होतात असं मानलं जातं. या कल्पनेमुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळालाही प्रोत्साहन मिळालं”, असं अर्चना भालेराव यांनी सांगितलं.

अर्चना भालेराव या अरुण भालेराव आणि शुभांगी भालेराव यांच्या स्नुषा असून त्या आता ‘अथर्वशीर्ष पठण’ आयोजित करण्याची कौटुंबिक जबाबदारी पुढे चालवत आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तात दिली आहे.

पहिलं अथर्वशीर्ष पठण कधी झालं होतं?

दरम्यान, १९८५ मध्ये झालेल्या पहिल्या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला फक्त १०-१५ महिला उपस्थित होत्या. मात्र, त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढत गेली आणि मागच्या वर्षी (२०२५) पुण्यातून सुमारे ३५ हजार महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. “मंदिर विश्वस्त मंडळ आणि ‘सुवर्णयुग तरुण मंडळा’ने या कार्यक्रमाच्या आयोजनात मोठी मदत केली होती. आता तर थायलंडमधील फुकेत येथील ‘एक्सचेंज स्टुडंट्स’ तसेच जर्मनी आणि अमेरिकेतील पर्यटकही यात सहभागी होतात. आमच्या संस्कृतीचा अनुभव घेण्याचं हे त्यांच्यासाठी एक उत्तम माध्यम आहे”, असं अर्चना भालेराव यांनी सांगितलं.

महिलांना अथर्वशीर्ष स्तोत्र पाठ असण्याची किंवा ते आधीपासून माहित असण्याची गरज नाही. भाविकांना प्रसाद दिला जातो, ज्यामध्ये स्तोत्राची छापील प्रतही असते. पहाटे २ वाजल्यापासूनच महिलांचे गट मूर्तीजवळ जागा मिळवण्यासाठी येतात. देवाचं दर्शन घेतल्यानंतर सकाळी ६ वाजता शंखनाद आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होते. प्रमुख पाहुणे येण्यापूर्वी गणपतीची प्रार्थना करणारं गीत वाजवलं जातं. त्यानंतर ‘मोरया’च्या जयघोषात पठणाला सुरुवात होते. पहाटेच्या वेळी जेव्हा हजारो महिलांचे आवाज एकवटतात, तेव्हा संपूर्ण परिसर श्रद्धा आणि ऊर्जेने दुमदुमून जातो. या उपक्रमातील एक विशेष आकर्षण म्हणजे १०० तरुणींनी महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेली आरती असते. त्या सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करतात. हे दृश्य अत्यंत मंगलमय असतं”, असंही अर्चना यांनी सांगितलं.