पुणे : शहरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होत असताना काही ठिकाणी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाले. मात्र, ध्वनिप्रदूषणाविरोधातील जनमताचा रेटा, पोलिसांचे नियमपालनाकडे लक्ष यामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा ‘आव्वाज’ नियंत्रणात असल्याचे जाणवले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उत्सवात मर्यादित स्वरूपात ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यासाठी चार बास आणि चार टाॅपलाच परवानगी दिली होती. तसेच, प्लाझ्मा साउंड, प्रेशर मिड उपकरणांचा वापर करण्यास मनाई केली होती. बहुतांश मंडळांनी हा नियम पाळला. मध्य भागात लेझर झोतचा वापर बऱ्यापैकी झाल्याचे दिसले.

यंदा बहुतांश मंडळांनी शुक्रवारी सायंकाळनंतर ध्वनिवर्धक यंत्रणेची चाचणी आणि लेझर झोत लावण्यासाठी विविध भागांतील रस्ते बंद केले होते. उपनगरांत विशेषत: हे चित्र होते. त्यामुळे यंदाही दहीहंडी ‘आव्वाजी’ होणार, अशी नागरिकांना भीती होती. मात्र, त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण होते. मध्य भागात शनिवारी सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मंडई, तुळशीबाग, शनिपार, कुमठेकर रस्ता, गणेश पेठेतील पांगुळ आळी, गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौक, गोविंद हलवाई चौक, सोमवार पेठ, गोखलेनगर, दीप बंगला चौक, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरात सायंकाळनंतर दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. काही ठिकाणी दुपारनंतर ढोल-ताशा पथकांनी स्थिरवादन केले.
चौकट

ध्वनिप्रदूषण केल्याबद्दल गुन्हा

ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार बास आणि चार टाॅपचा वापर करण्याची परवानगी असताना बिबवेवाडीतील एका मंडळाने आठ बास आणि टाॅपचा वापर केल्याने पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी प्रतीक करंजे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ‘सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी संबंधित मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली.