पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनिक्षेपकांबाबत पोलिसांनी नियमावली निश्चित केली असून, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनिक्षेपक वापरल्यास कारवाईचा इशारा दिला. मात्र, आजच्या दहिहंडी कार्यक्रमाच्या तयारीसाठी काल, शुक्रवारीच शहरातील अनेक भागांत रस्ते बंद करण्यापासून ध्वनियंत्रणेच्या चाचण्या सुरू झाल्याने ध्वनिमर्यादा पाळली जाणार, की नियमोल्लंघन होणार, असा प्रश्न पुणेकरांना पडला.
दहीहंडी साजऱ्या करणाऱ्या मंडळांना ‘भरीव’ साहाय्य करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्ते, समर्थक आघाडीवर असून, शहरभर तशी फलकबाजीही झाली. यामध्ये चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींच्या उपस्थितीची चर्चा आहे. शिवाय, या फलकांवर उत्सवासाठी कोणती उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा आणि प्रकाशयोजना वापरली जाणार आहे, यांची छायाचित्रांसह जाहिरात करण्यात आली आहे.

गेली काही वर्षे शहरातील मध्य भागासह धनकवडी, वारजे, कोथरूड, सिंहगड रस्ता, विमाननगर, वडगाव शेरी, कात्रज भागांतील मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यासाठी ध्वनियंत्रणा आणि प्रकाशयोजनेवर लाखो रुपये खर्च होतात. यंदाही तसेच चित्र असले, तरी ध्वनिप्रदूषणाविरोधात जनमता रेटा असल्याने नियमभंग झाल्यास पोलीस काय कारवाई करतात, याबाबत पुणेकरांना उत्सुकता आहे.

नियमभंग केल्यास ध्वनियंत्रणा जप्त

‘दहीहंडी उत्सवात ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मंडळांनी छुप्या पद्धतीने अधिक क्षमतेचे ध्वनिक्षेपक लावल्यास गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येणार आहे. पोलीस ध्वनिक्षेपक यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

ध्वनिक्षेपक यंत्रणेत ‘प्रेशर मिड’, ‘प्लाझ्मा साउंड’ या उपकरणांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम धुडकाविल्यास मंडळांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येईल. उत्सवांमध्ये केवळ ‘चार बास, चार टॉप’चा वापर करण्यास परवानगी आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

ध्वनिक्षेपकांबाबत न्यायालय, तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येणार आहे. इंदापूर येथील गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. – बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट

शहरात बंदोबस्त; वाहतूक बदल

दहीहंडीनिमित्त शनिवारी मध्य भागासह शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मध्य भागातील बहुतांश रस्त्यांवर शनिवारी सायंकाळनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश पेठेतील महाराणा प्रतापसिंह रस्ता, कसबा पेठेतील गणेश रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.