पुणे : दहीहंडी उत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ध्वनिप्रदूषण प्रकरणात पोलिसांनी ११६ खटले दाखल केले आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेतील चार प्रेशरमीड, चार प्लाझ्मा साउंडसह सहा ध्वनीक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात आली आहेत.
दहीहंडी उत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात इशारा देण्यात आला होता. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी शहर, उपनगरात दहीहंडी उत्सवात उच्च ध्वनिवर्धकांचा वापर करणाऱ्या मंडळांची तपासणी केली. त्यासाठी डेसिबलची मोजमाप करणाऱ्या यंत्रणेचा वापर करण्यात आला. पोलिसांनी शहर, उपनगरातील ११०० मंडळाची तपासणी केली. दहीहंडी, गणेशोत्सवात मंडळांनी ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार बास, चार टाॅपचा वापर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. प्रेशरमीड, प्लाझ्मा साऊंड उपकरणांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील बहुतांश मंडळांनी सूचनांचे पालन केले. काही मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा वापर केला नाही.
‘दहिहंडीत आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ११६ मंडळांविरुद्ध खटले दाखल केले आहेत. सर्वाधिक खटले मध्य भागातील मंडळांविरुद्ध (परिमंडळ एक) दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ एकमधील ५५ मंडळांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपक यंत्रणेत बंदी घालण्यात आलेल्या प्रेशरमीड, प्लाझ्मा साऊंडचा वापर करण्यात आल्याचा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ही उपकरणे जप्त केली. पोलिसांनी चार प्रेशरमीड, चार प्लाझ्मा साऊंड, तसेच सहा ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त करण्यात आल्या आहेत’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
