मावळ परिसरात मुसळधार पाऊस झाला असून यामुळे भातशेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ हा भातशेतीचे आगर म्हणून ओळखले जाते. बहुतांश शेतकरी हा भाताची लागवड करत असतो. परंतु, भाताचे पीक जोमात आले असताना मुसळधार पावसाने हजेरी लावत पिकाचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याच पाहायला मिळत आहे. तो सरकरच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे..

मावळमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये ५०० पेक्षा अधिक मी.मी पाऊस कोसळला असून यामुळे मावळ परिसरातील सखल भागात आणि शेतीमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून भातखाचरे तुडुंब भरले होते. शिवाय, काही ठिकाणी भाताचे पीक आडवे देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तर, शेतीचे बांध फुटल्याने अनेक पीकं वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी गुलाब शेतीचे देखील नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावर्षी भाताचे पीक जोमात आले होते. मध्यंतरी पाऊस नसल्याने पीक जात की काय? असं शेतकऱ्याला वाटत होतं. मात्र, पावसाने पुन्हा आगमन करत शेतकऱ्याला दिलासा दिला. परंतु, सोमवार पासून महाराष्ट्रासह मावळ भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाला बसला आहे. अद्याप, मावळ भागात शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नसल्याचं स्थानिक सांगतात.