पुण्यातील डांगे चौक परिसरात एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू गृहसंकुलाच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने तिच्या ७ वर्षांच्या चिमुकल्या मुलासह जीवन संपवलं. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, घरातून ६ ते ७ पानांची चिठ्ठी हस्तगत केली आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

१८ व्या मजल्यावरून घेतली उडी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळचे राजस्थान येथील हे कुटुंब डांगे चौक परिसरातील ‘सिग्नेचर पार्क’ या सोसायटीत गेल्या दोन वर्षांपासून राहत होते. मृत महिलेचे पती पुण्यात एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहेत.

सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महिला आपल्या मुलाला घेऊन लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसली. तेथे पोहोचल्यानंतर तिने आपल्या चपला बाजूला काढल्या आणि मुलासह थेट खाली उडी मारली. दोघेही इमारतीच्या डक्ट एरियामध्ये पडल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चिठ्ठीत काय?

पोलिसांना मृत महिलेच्या घरातून ६ ते ७ पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये तिने पतीच्या भविष्याची आणि मुलाची तीव्र चिंता व्यक्त केल्याचे समोर आले आहे. महिला गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होती. या आजारपणाच्या त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. चिठ्ठीत तिने आपल्या पतीवर अतिशय प्रेम असल्याचे नमूद केले असून, त्यांच्यात कसलाही कौटुंबिक किंवा वैवाहिक वाद नव्हता, असे स्पष्ट केले आहे. “माझ्या दुःखातून बाहेर पडून पतीने पुन्हा नवीन आयुष्य सुरू करावे आणि दुसरे लग्न करावे,” अशी विनंती तिने केली आहे.

“माझ्या मृत्यूनंतर माझा मुलगा माझ्याशिवाय जगू शकणार नाही, तो सतत माझी आठवण काढेल,” या भीतीने तिने मुलालाही सोबत नेण्याचा निर्णय घेतला. तसेच, मुलाच्या उपस्थितीमुळे पतीला दुसरे लग्न करताना अडचणी येऊ नयेत, असा विचारही तिने पत्रात मांडल्याचे समोर आले आहे.

वाकड पोलिसांकडून सखोल तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवले आहेत. मृत महिलेच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार:
“डांगे चौक येथील सिग्नेचर पार्क सोसायटीत महिला व मुलाचा मृतदेह डक्टमध्ये सापडल्याची माहिती सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिळाली. तपासात ही महिला तिच्या मुलासह १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे निष्पन्न झाले. घरातून ६ ते ७ पानांची सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून, आरोग्याच्या समस्येमुळेच तिने हे पाऊल उचलल्याचे दिसते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.”