पुणे : उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. दशहरी आंब्यांना चांगली मागणी असून, घाऊक बाजारात एक किलो दशहरी आंब्यांना ५५ ते ७० रुपये दर मिळाले आहे.

रत्नागिरी, तसेच कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम संपला आहे. मुळशी, वेल्हा तालुक्यातील गावरान आंब्यांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डातील फळबाजारात आवक वाढली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, मलियाबाद परिसरातून दशहरी आंब्यांची आवक होत आहे. मार्केट यार्डातील दिल्ली फ्रुट एजन्सीचे तौसिफ हाजी फारूख शेख, जुनेद हाजी फारुख शेख यांच्या गाळ्यावर दशहरी आंब्यांची आवक झाली आहे. फळबाजारात साधारणपणे दररोज १२ टन आंब्यांची आवक होत आहे.

हेही वाचा – ‘एआय’च्या साह्याने ‘मेटा’ पकडतेय फेसबुक, इन्स्टाग्रामवरची वयचोरी!

दशहरी आंबा चवीला गोड आहे. पुण्यातील फळबाजारातून सातारा, सांगली, लातूर येथील बाजारात आंबा विक्रीस पाठविला जात आहे. पुढील पंधरा दिवस दशहरी आंब्याची आवक सुरु राहणार असल्याचे शेख यांनी सांगितले. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी कर्नाटकातील आंब्यांची तूरळक आवक झाली. गावरान आंब्याची १० ते १२ टन आवक झाली. एक किलो गावरान आंब्याला ३० ते ४० रुपये, केशर आंब्याला ५० रुपये, तोतापुरी आणि दशहरीला ४० ते ५० रुपये दर मिळाल्याची माहिती व्यापारी संजय निकम यांनी दिली.

गुजरात केशर आंब्यांना उच्चांकी दर

गुजरात केशर आंब्यांना उच्चांकी मिळाला. एक किलो गुजरात केशर आंब्यांना प्रतवारीनुसार १०० ते १५० रुपये दर मिळाले. गुजरातहून केशर आंब्याची एक हजार प्लास्टिक जाळ्यांमधून (क्रेटस्) आवक झाली. पुढील दोन ते तीन दिवस केशर आंब्यांची आवक सुरु राहणार आहे.

हेही वाचा – आळंदी : इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली; काही तासांवर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा!

उत्तर भारतीयांकडून दशहरीला मागणी

जून महिन्यात उत्तर प्रदेशातील दशहरी आंब्यांची आवक सुरू होते. दशहरी आंबा चवीला गोड असतो. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. दशहरी आंब्यांची उत्तर भारतीय नागिरक आवर्जून वाट पाहत असतात. उत्तर भारतीयांकडून दशहरीला चांगली मागणी आहे.