पुणे: कलेच्या आविष्काराचे मुक्त व्यासपीठ असलेला डेक्कन जिमखाना परिसरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील कलाकार कट्ट्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची एकही तक्रार डेक्कन पोलीस ठाणे किंवा पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे दाखल झाली नसल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे.

वाहतूक कोंडी आणि काही वेळा रात्री-अपरात्री होणाऱ्या गोंगाटामुळे हा कट्टा स्थलांतरित करावा, अशी मागणी स्थानिकांनी तेथील भाजप नगरसेवकांकडे केली होती. भाजप नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना याबाबत निवेदनही दिले. मात्र, येथे नेहमी कला सादर करणारे कलाकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीने कलाकार कट्ट्याच्या स्थलांतराला विरोध करून आंदोलनही पुकारले. त्या पार्श्वभूमीवर, या कट्ट्याविरोधात वाहतूक पोलिसांकडे गेल्या तीन वर्षांत किती तक्रारी आल्या आहेत, असा अर्ज माहिती अधिकारात करण्यात आला. त्यावर एकही तक्रार आलेली नसल्याचे उत्तर वाहतूक पोलिसांनी दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

कलाकार कट्ट्याचा उद्देश काय होता?

‘मनीमानसी’ असलेले कॅनव्हासवर चितारणारे चित्रकार, नागरिकांना ‘माॅडेल’ करून त्यांचे चित्र-व्यंगचित्र चितारणारे अर्कचित्रकार, बासरीवादन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे, ‘कराओके’वर गीत सादर करणारे हौशी गायक अशा कलाकारांचे मोहोळ असल्याने त्यांच्या मुक्त कलाविष्कारासाठी हक्काचे स्थान असावे, या उद्देशातून डेक्कन जिमखाना परिसरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात ‘कलाकार कट्टा’ पुणे महापालिकेने साकारला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या कलाकार कट्ट्याचे कौतुक केले होते.

नेमका प्रश्न काय आहे?

पंतप्रधानांनी प्रशंसा केलेला हा कट्टा आता वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्याने निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित करण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्याने हा विषय ऐरणीवर आला. हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक आघाडीने यामध्ये उडी घेऊन आंदोलन केले. एवढेच नव्हे, तर कलाकार कट्ट्याचे स्थलांतर करू नये, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी महापालिका आयुक्तांसह उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यामुळे ही बाब महायुतीतील घटक पक्षांमधील श्रेयवादाची बनली.

स्थानिकांच्या तक्रारी काय?

‘वेडीवाकडी लावलेली वाहने, रस्त्यात उभे राहणारे नागरिक आणि पदपथ मोठा झाल्याने भांडारकर रस्त्याला वळणाऱ्या बसना होत असलेला अडथळा यांमुळे रहदारीला अडचण येत असून, आपत्कालीन वाहनेही घरापर्यंत येऊ शकत नाहीत. स्वत:च्याच घरी येण्यासाठी नागरिकांशी वाद घालत वळसा मारावा लागतो,’ अशा डेक्कन परिसरातील नागरिकांच्या तक्रारी नागरिकांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेवकांसमोर मांडल्या.

माहिती अधिकारात काय उघड झाले?

‘‘कलाकार कट्ट्या’मुळे गेल्या तीन-चार वर्षांत वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्याची तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचीही कोणतीही नोंद आढळलेली नाही, अशी डेक्कन पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस विभागाकडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कलाकार कट्टा हटवण्यामागील कारणे वस्तुस्थितीला धरून नाही. पुण्यातील कलाकारांच्या या सांस्कृतिक केंद्राला अन्यायकारक पद्धतीने लक्ष्य केले जात आहे,’ याकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, ‘पुण्यामध्ये दररोज किमान ५० रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. त्याविषयी कधी कोणत्या नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे का? ‘कलाकार कट्टा’मुळे वाहतूक कोंडी होत नाही, यामध्ये काही तथ्य नाही. मुळात रस्ता रुंदीकरण करण्यासाठी घेतलेल्या जागेवर कलाकार कट्टा उभारण्यास आमचा विरोध आहे. ज्या कारणास्तव ही जागा घेतली त्यानुसार त्याचा वापर होत नसल्याने ही जागा कॉलनीला परत करावी, अशी मागणी आम्ही महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे,’ असे डेक्कन जिमखाना कॉलनीचे अध्यक्ष किशोर गोडबोले यांनी सांगितले.