पुणे : पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला आज नेहमीप्रमाणे उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली. सारे काही सुरळीत सुरू असताना, एका गणेश मंडळाच्या देखाव्याच्या काही भागाने पेट घेतल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र, कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवून वेळेत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: फिनिक्स मॉलमध्ये हवेत गोळीबार? गोळीबार करणारा फरार

हेही वाचा – इंदापूरमध्ये विसर्जनासाठी गेलेला सोळा वर्षांचा मुलगा नदीत बुडाला

लक्ष्मी रस्त्यावर सुमारे ५ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. घटना घडण्यापूर्वी काहीच वेळ आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली होती. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होती. संबंधित मंडळाचा गणपती त्यांच्या नियोजित जागी आला, तेव्हा परशुराम पथकाचे वादन टिपेला पोहोचले होते. नागरिकांनीही ठेका धरला होता. त्याच वेळी रथावरील श्रींच्या मूर्तीमागे आतषबाजीसाठी वर्तुळाकार बसविण्यात आलेले फायर सुरू करण्यात आले. ते संपत असतानाच दोन्ही बाजूंनी मागील कापडावर ठिणगी पडली आणि कापडाने पेट घेतला. काही क्षण गोंधळ निर्माण झाला. पण, कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवून गाड्याकडे धाव घेतली. पाठीमागून वर चढून त्यांनी आधी पुढील कापडापासून मागील कापडाचा संपर्क तोडला आणि नंतर आग विझवून मिरवणूक सुरू ठेवली. त्यानंतर जळालेला भाग काढून टाकण्यात आला. ‘देव काळजी घेतो,’ अशीच भावना त्या वेळी नागरिकांमध्ये उमटली आणि मोरया.. मोरयाचा गजर टिपेला पोहोचला…