पुणे : राज्यातील लाखो वारकऱ्यांसाठी ‘देहू ते पंढरपूर’ वारी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, कामाचे व्याप आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे पायी प्रवासासाठी वेळ काढणे शक्य होत नाही. मात्र, अशा अनेकांसाठी ‘सायकल वारी’ हा नवा पर्याय समोर येत आहे.

दहा वर्षांपूर्वी अवघ्या सात सायकलस्वारांपासून सुरू झालेल्या ‘सायकल वारी’ उपक्रमात आता २ हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी होतात. प्रवासाचे साधन बदलले, तरी विठ्ठलभक्ती आणि वारीचा उत्साह तसाच आहे. शनिवारी (२० जून) पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील २ हजार ३५० सायकलस्वारांनी व्यस्त कामकाज आणि ‘विठ्ठलभक्ती’चा मेळ घालून पालखी मार्गावर सायकल चालवली.

देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीचे ७ जुलैला, तर आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे ८ जुलैला प्रस्थान होणार आहे. त्यात सहभागी होणारे लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरचा अंतिम मुक्काम १८ ते २१ दिवसांची पायी वारी करत, सुमारे २५८ किलोमीटरपर्यंतचा प्रवास पायी करतात.

पुण्यातील सात सायकलस्वार आणि ट्रेकर्सच्या एका गटाने २०१६ मध्ये ‘सायकल वारी’ या उपक्रमाची सुरुवात केली. यात अॅड. गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील आणि गिरिराज उमरीकर यांचा समावेश होता.

सुमारे ३० हजार सायकलस्वार, ट्रेकर्स आणि क्रीडाप्रेमींचा समावेश असलेल्या ‘इंडो-अॅथलेटिक सोसायटी’चे (आयएएस) संस्थापक-अध्यक्ष असलेले ४२ वर्षीय खैरे त्या आठवणींना उजाळा देतात. ते सांगतात, ‘आमच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे आम्हाला जास्त दिवस सुट्टी मिळणे शक्य नव्हते, त्यामुळे आम्ही पायी वारीत सहभागी होऊ शकलो नाही. पण, आमचे वारीशी तितकेच आध्यात्मिक नाते असल्याने आम्ही सायकल वारी करण्याचा निर्णय घेतला. सायकलने पंढरपूरला जायचे ठरवले.’

या वर्षीच्या उपक्रमाबद्दल आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले ४४ वर्षीय उमरीकर सांगतात, ‘यंदा सायकल वारीत अनेक कुटुंबे सहभागी झाली होती. अनेकांनी हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला, तर काहींनी ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवली. या वारीमध्ये ३०० हून अधिक महिला आणि १०० मुलांनी सहभाग घेतला. यंदा हैदराबादचे एक ऐंशी वर्षांचे आजोबा सहभागी झाले होते.’

वारीतील वाढत्या सहभागाबद्दल खैरे म्हणाले, ‘२०१६ मधील ७ वरून, २०१७ मध्ये सायकलस्वारांची संख्या २४ झाली. ही संख्या पुढे २०१८ मध्ये १६० आणि २०११ मध्ये सुमारे ५०० झाली. कोरोना काळातही आम्ही सायकल वारी सुरूच ठेवली. २०२१ मध्ये १७५, २०२२ मध्ये १ हजार २००, २०२३ मध्ये १ हजार ५००, २०२४ मध्ये १ हजार ७५०, २०२५ मध्ये १ हजार ९५० आणि या वर्षी २ हजार ३५० सायकलस्वार या उपक्रमात सहभागी झाले.’

सरकारी कंत्राटदार असलेले ५६ वर्षांचे गणेश भुजबळ सायकलिंगमुळे वर्षानुवर्षे तंदुरुस्त राहिल्याचे नमूद करतात. भुजबळ दररोज शाहूनगर येथील आपल्या घरापासून घोरवडेश्वर आणि परत असा ४० किलोमीटरचा प्रवास सायकलने करतात. भुजबळ यांच्याप्रमाणेच, बहुतांश सायकलस्वारांसाठी ‘सायकल वारी’मधील सहभाग हा तंदुरुस्ती आणि आरोग्याचा अर्थपूर्ण प्रवास होता. त्यांना या वारीने स्वतःशी, निसर्गाशी आणि समाजाशी जोडण्यास मदत केली.