पुणे : ‘डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांची केवळ रॅपिड चाचणी करण्याऐवजी ‘एलिझा’ चाचणीद्वारे निदानाची खातरजमा करावी,’ असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. त्याच वेळी, केवळ ‘पीसीआर’ चाचणीने निदान झालेल्या रुग्णांनाच निश्चित डेंग्यूचे रुग्ण मानण्याऐवजी डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचीही नोंद करण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

पुण्यामध्ये वर्षभरात डेंग्यूच्या आठ संशयित रुग्णांचे मृत्यू महापालिका प्रशासनाने नोंदवले आहेत. यांपैकी दोघांचे ‘रॅपिड’ चाचण्यांचे आहवाल सकारात्मक, तर ‘एलिझा’ चाचणीचे अहवाल नकारात्मक आले होते. त्यामुळे डेंग्यूच्या निदानासाठी कोणत्या चाचणीद्वारे योग्य आणि अचूक निदान होते, यावर वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकला.

संसर्गविकार तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ‘पीसीआर चाचणी आजाराच्या पहिल्या आठवड्यात उपयुक्त ठरते; मात्र तिचा खर्च तीन ते चार हजार रुपये असल्याने प्रत्येक रुग्णाला ती करणे शक्य होत नाही. त्यामुळे तुलनेने कमी खर्चाच्या ‘रॅपिड’ आणि ‘एलिझा’ चाचण्यांचा वापर केला जातो. या चाचण्यांचे अहवाल लवकर मिळत असल्याने उपचार सुरू करण्यास मदत होते. मात्र, ‘पीसीआर’च्या तुलनेत त्यांची संवेदनशीलता कमी असते. गेल्या काही दिवसांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दहा रुग्णांमध्ये किमान तीन रुग्ण डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे आढळत आहेत. पालिका प्रशासनाने हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे.’

ससून रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्राध्यापिका डॉ. सुषमा पेडणेकर म्हणाल्या, ‘रॅपिड चाचणीचा अहवाल नकारात्मक आला, तरी रुग्णाला डेंग्यू नाही, असा निष्कर्ष काढू नये. लक्षणे कायम असल्यास पुढील तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः लक्षणे सुरू झाल्यानंतर नमुना घेण्याची वेळ आणि चाचणीचा प्रकार यांनुसार निदानाच्या अचूकतेत फरक पडू शकतो.’

वर्गीकरणामुळे रुग्णांच्या संख्येबाबत संभ्रम

महापालिका आणि आरोग्य यंत्रणांकडून ‘पीसीआर’ चाचणीने निदान झालेल्या रुग्णांना निश्चित डेंग्यू, तर इतर चाचण्यांद्वारे निदान झालेल्यांना संशयित रुग्ण म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात डेंग्यूची लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांचे चित्र अधिकृत आकडेवारीत पूर्णपणे प्रतिबिंबित होत नाही. रुग्णांची नोंद आणि निदानातील अचूकता यांना प्राधान्य दिल्यास आरोग्य यंत्रणेला साथीची व्याप्ती समजून उपाययोजना करणे अधिक सोपे होईल,’ असे खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डेंग्यूसाठी कुठल्या चाचण्या ?

डेंग्यूच्या निदानासाठी ‘एनएस १ रॅपिड कार्ड चाचणी’, ‘एलिझा’ आणि ‘पीसीआर’ या प्रमुख चाचण्या केल्या जातात. मात्र, बहुतांश रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णाची प्रथम ‘रॅपिड’ चाचणी केली जाते. यातून निष्पन्न होणाऱ्या निदानावर पुढे ‘एलिझा’ चाचणी करायची की नाही हे ठरवले जाते. ‘रॅपिड’ चाचणीचे निदान सकारात्मक आले, तर रुग्णाला नव्वद टक्के डेंग्यूचे निदान होते. मात्र, चाचणी नकारात्मक आली, तर ‘एलिझा’ चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो,’ असे ससून रुग्णालयातील तज्ज्ञांनी सांगितले. ‘डेंग्यूच्या निदानासाठी एलिझा चाचणीत ‘एनएस १’ प्रतिपिंडांची तपासणी केली जाते. आजाराची लक्षणे सुरू झाल्यानंतर पाच दिवसांनी नमुना तपासायचा असल्यास रॅपिड चाचणीऐवजी ‘एलिझा’ चाचणीला प्राधान्य द्यावे,’ असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात.