पुणे : शहरात सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येने या वर्षातील आतापर्यंतचा उच्चांक गाठला. सप्टेंबर महिन्यात ६६२ डेंग्यूरुग्णांची नोंद झाली, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. महापालिकेच्या १६ प्रभागांमधील आकडेवारीनुसार जानेवारी ते मे या कालावधीत एकही डेंग्यूरुग्ण नोंदला गेला नाही. जूनपासून डेंग्यूच्या रुग्णांची नोंद सुरू झाली.
त्यानंतर जूनमध्ये १०३ रुग्ण, जुलैमध्ये ३६६, ऑगस्ट महिन्यात ५१२, तर सप्टेंबरमध्ये ६६२ डेंग्यूरुग्णांची नोंद झाली. जून महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमधील रुग्णसंख्या सुमारे साडेसहा पटींनी वाढली. नगर रस्ता-वडगावशेरी, कोथरूड, औंध-बाणेर, येरवडा-कळस-धानोरी आणि धनकवडी-सहकारनगर या भागांमध्ये तुलनेने अधिक रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरमध्ये औंध-बाणेरमध्ये १०७, नागररोड-वडगावशेरीत ८३ आणि कोथरूडमध्ये ८० रुग्णांची नोंद झाली. केशवनगरमध्येही सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊन ती ४९ वर पोहोचली.
कोथरूड, औंध-बाणेर ‘हॉट स्पॉट’
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत महापालिका हद्दीत सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद कोथरूडमध्ये, नगर रस्ता-वडगावशेरी आणि औंध-बाणेरमध्ये झाली आहे. हे तीन वॉर्ड डेंग्यूचे प्रमुख हॉटस्पॉट ठरले आहेत. या भागांमध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
डेंग्यू रुग्णसंख्या
जानेवारी ते मे – ०
जून : १०३
जुलै : ३६६
ऑगस्ट : ५१२
सप्टेंबर : ६६२
जानेवारी–सप्टेंबर एकूण : १,६४३ (महापालिका हद्द)
शहराबाहेरील : ५३१
पत्ता उपलब्ध नसलेले : २१८
एकूण नोंद : २,३९१
डेंग्यूचे ‘हॉट स्पॉट’
कोथरूड : २२९
नगर रस्ता-वडगावशेरी : २२२
औंध-बाणेर : २१२
धनकवडी-सहकारनगर : १३९
येरवडा-कळस-धानोरी : १३७
घोले पाटील रस्ता : १०३
डेंग्यू बचावासाठी काय करावे?
- अंग झाकणारे कपडे घालावेत.
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
- कुलर, झाडांच्या कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे.
- परिसरात जर कुठे डबके असेल तर महापालिकेला कळवावे.
- आरोग्य विभागाकडून वारंवार परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घ्यावा.
आरोग्य तज्ञ काय म्हणतात ?
गेल्या वर्षीही या सुमारास आकडेवारी अशी होती. महापालिका आरोग्य विभागाने साप्ताहिक अळीनाशक कार्यक्रम हाती घेतला आहे. शहराच्या ज्या भागांत डास उत्पत्ती होत आहे त्या भागाची यादी तयार केली जात असून त्या ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. अशी माहिती महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
डेंग्यू विषयी अधिक माहिती देताना
सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल जोशी म्हणतात, पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात साचलेल्या पाण्यामुळे एडिस इजिप्ती डासांची पैदास वाढते. वेळीच दक्षता घेतल्यास हा आजार टाळता येतो. डास उत्पत्ती रोखा. तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ, उलट्या, तीव्र पोटदुखी, हिरड्या किंवा नाकातून रक्तस्राव ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
